'मिळून साऱ्याजणी'चा ३१ वा वर्धापन दिन ९ ऑगस्ट २०२० रोजी साजरा झाला. त्यानिमित्ताने मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतिशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने या मासिकानं सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणारा 'विद्या बाळ अध्यासन प्रकल्प' सुरु केला गेला. प्रकल्पाच्या प्रमुख गीताली वि. मं. आणि समन्वयक सुवर्णा मोरे होत्या. या प्रकल्पाची उद्दिष्टे अशी होती -

  • विद्या बाळ यांनी मासिकाच्या माध्यमातून वाचकांबरोबर सुरु केलेला संवाद आणि त्याचे ऐतिहासिक योगदान / स्त्री प्रश्नांची मांडणी करण्यामधील मिळून साऱ्याजणीचे योगदान अभ्यासणे.
  • मासिकाने ३१ वर्षात घेतलेल्या वेगवेगळ्या विषयांची आणि उपक्रमांची चिकित्सा करणे.
  • मासिकाचा दर्जा उंचावून भविष्यातील मासिकाची वाटचाल दमदार व्हायला मदत करणे.
  • मासिक आणि वाचक यांच्यामधील संवादाचा अभ्यास आणि भविष्यातील वाटचालीचा वेध घेणे.

'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा' या शीर्षकाने हा अभ्यास प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. या प्रकल्पामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग प्रमुख अनघा तांबे, स्वाती देहाडराय, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख उज्ज्वला बर्वे, र्सेंट मीराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख वैशाली दिवाकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन यांचे बहुमोल आर्थिक सहाय्य या प्रकल्पाला लाभले. मिळून साऱ्याजणी मासिकाच्या ३१ वर्षांच्या प्रवासातल्या या सर्वदूर पसरलेल्या अक्षरवाटा विद्या बाळ अध्यासन प्रकल्पामुळे उजळून निघाल्या. आत्मभान, समाजभान आणि माणूसभान जागवणारा साऱ्याजणीचा हा प्रवास रोमांचकारी आहे. या प्रवासात भेटलेल्या माणसांना भेटताना आणि विविध वळणांवरून जाताना आपणा सर्वांना समृद्ध करणारा अनुभव मिळेल असा विश्वास वाटतो.

'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा' या प्रकल्पाचे संपूर्ण संकलन वाचकांसाठी इथे पीडीएफ फाइलच्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.